युवा महोत्सव-एक अनुभव
महाविद्यालयीन कलाकारांचा जीव कि प्राण असलेला #युवा_महोत्सव' विषाणूच्या प्रादुर्भावाने प्रभावित झाला.जीवनातील आनंदाचे काही क्षण निसटून गेले.जीव महत्वाचा मग कला.भारी असतात हे दिवस. कार्यक्रमाच्या तालमी वगैरे. गमती-जमती. भानगडी. भावूक होणे. उत्सुकता. उन्माद. निराशा. रुसणे फुगणे.असे अनेक मजेदार अनुभव मिळतात.
#गेल्या_वर्षीचा_एक_अनुभव-
#युवा_महोत्सव' दोन दिवसावर आलेला.रंगीत तालीम चाललेली. तालीम पाहण्यासाठी प्राध्यापक, मुलांचे पालक जमलेले. मुकनाट्य कलाप्रकाराचे सादरीकरण चालले होते.
आता मूकनाट्य कसं असाव? अगदी गमतीदार, मजेशीर.वगैरे.पण अलीकडे मूकनाट्य म्हणजे स्टंट. हे समीकरण झाले आहे.आणि आमच्या महाविद्यालयाची मुले मुकानाट्य या कलाप्रकारात सलग तीन वर्ष प्रथम बक्षीस मिळवतात.भारी वाटते.
मूकनाट्य सुरु झाले. पूर ही संकल्पना घेऊन मुकानाट्य सादर केलेले.एक किरकोळ देहयष्टीच्या मुलाने पाण्यात सूर मारावा तसा सूर सतरंजीवर मारला. नवखा असल्याने प्रेक्षक पाहून खूप उत्साही झाला असावा. कसा सूर मारला कोण जाणे? खांद्यापासून हात निखळला. तरीही तसच मूकनाट्य चालू.
दोन मिनिटांनी त्याला खुप वेदना होऊ लागल्या व तो बाजूला झाला. लगेच बदली कलाकाराने तेवढ्याच उत्साहाने मुकनाट्य पूर्ण केले. हा बाजूला बसून निखळलेला हात स्वतःच बसवतोय. काय झाले मला समजेना.जवळ जावून पाहतो तर त्याचा हात खांद्यापासून पूर्ण बाजूला. मी प्रचंड घाबरलो. रंगीत तालीम तिथेच सोडून त्याला लगेच हाडाच्या डॉक्टरांकडे घेवून गेलो.डॉक्टरांनी सांध्यात हात बसवला. मजबूत पट्टा लावला.गोळ्या दिल्या. त्याला१५ दिवस विश्रांती घ्यायला सांगितले.
मुलगा एका खेड्यातला.मी त्या मुलाला सांगितले बाबारे तू आता घरी जा. विश्रांती घे.आम्ही पाहतो काय करायचे ते.
पण तो काही केल्या घरी जायला तयार होत नव्हता. त्याला युवा महोत्सव पाहायचा होता.मी घाबरलेलो. कमी ज्यास्त काय झाल तर काय घ्या? पण तो काम करण्यावर ठाम.त्याच्या अंगात कला भिनलेली.
वेदना खूप होत होत्या पण त्याला संघातून बाद करतील म्हणून तोंडातून वेदनेचा एक हुंकार निघू देत नव्हता.
तो फक्त मूकनाट्यच नाही तर एकांकिकेत व लोकनृत्य कलाप्रकारात सुद्धा होता. मोठीच अडचण झाली आमची. शेवटी त्याच्या जागी इतर कलाकार तयार करून आम्ही 'युवा महोत्सव' पार पडायचे ठरविले. तो खूपच निराश झाला.रडू लागला.त्याला युवा महोत्सवात यायचेच होते.पालकांचे हमीपत्र भरून घेतले व त्याला फक्त संघासोबत यायची परवानगी दिली.
इतर कलाकाराच्या मदतीने मूक नाट्य जोरात झाले.प्रथम क्रमांक भेटला.
लोकनृत्य सुरु झाले. आमचा क्रमांक पुकारला. मी समोर प्रेक्षकात बसून चिंतेत पडलेलो कि आता नवीन बदली मुलगा कसे लोकनृत्य सादर करणार? कारण लोकनृत्य सहज एकदोन दिवसात करणे सोपे नसते. लोकनृत्य सुरू झाले. तर हा खांदा निखळलेला वस्तादच नाचत नाचत स्टेजवर आला.
लोकनृत्या मध्ये एकमेकांच्या खांद्यावर चढण्याच्या स्टेप होत्या.आता हा कशा करणार? मी वैतागलो.याला कशाला घेतले पुन्हा?
पण Prasad Vibhute ची कला.त्यांने दोन दिवसात त्या विद्यार्थ्यांच्या स्टंट स्टेप वगळून लोकनृत्य पार पाडले. मला मात्र हे लोक काहीच बोलले नाहीत.कारण मी सक्त ताकीद दिली होती की त्याला पुन्हा स्टंट देऊ नका म्हणून.
मी अजून विचार करतो की त्याच्या त्या वेदना कुठे गेल्या.त्याचे तोंड पाहावत नव्हत खांदा निखळल्यावर. त्याने नृत्य कसे केले असेल त्यालाच माहित? कशा वेदना सहन केल्या असतील त्यालाच माहित? लोकनृत्य झाले. स्टेज मागे भेटायला गेलो तर सगळे पेकाळून पडलेले. हा ही होता. आता रागावण्यात अर्थ नव्हता. शाब्बासकी दिली.लोकनृत्य छान झाले होते.
लोकनृत्य कलाप्रकारात पण आम्ही द्वितीय बक्षीस मिळविले.
मी समजलो कला वेदना विसरायला भाग पाडते.कलेची धुन्दी चढली कि कसलीच तमा रहात नाही हे खरेच.
