Saturday, February 22, 2020

#म्होरक्या:The Leader

#म्होरक्या:The Leader

परेड शिकण्यासाठी मुलाने केलेला संघर्ष,आटापिटा जवळून पाहिलेली आई जेव्हा मुलाची परेड पाहण्यासाठी शाळेत जाते तेव्हा मुलगा परेड न करता ड्रम वाजवताना पाहून आईला किती दुःख झाले असेल? हे शब्दात व्यक्त करता येत नाही.

मागील दोन वर्षापासून चर्चित व बहुप्रतीक्षेत असलेला म्होरक्या पाहिला आणि कितीतरी दिवसांनी वेगळा विषय व आशय असलेला सिनेमा पाहिल्याचा आनंद झाला.
दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला म्होरक्या तसेच फॅन्ड्री,अनुमती,डोंबिवली फास्ट, नटसम्राट असे वेगवेगळे विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येणारे सिनेमे हल्ली दुर्मिळ झालेले आहेत.

प्रत्येकाच्या जगण्याचा संघर्ष विविधांगी असतो कधी तो जगण्या-मरण्याशी थेट भीडणारा असतो तर कधी अस्मितारक्षणासाठी तडफडणारा असतो,कधी मोठ्यांचा तर कधी छोट्यांचा असतो. छोट्यांचे,लहानांचे, सामान्यांचे संघर्ष म्हणजे किरकोळ अशी भावना समाजमनात रूढ झालेली असते. एखाद्याने दोन वेळच्या भाकरीच्या भ्रांतेपोटी केलेली वनवन, ना पिढीजात श्रीमंतांना कळेल ना ऐतखाऊ वर्गाला.

म्होरक्या मधील अशोक परेड शिकण्यासाठी व सादर करण्यासाठी जो संघर्ष करतो तेव्हा एकवेळ असे वाटते कि याची खरंच गरज होती का? आणि दुसऱ्याच क्षणी जाणवते की,हा होती? कारण शेवटी कुठला ना कुठला संघर्ष माणसाला जगण्याचे बळ आणि आनंद देतो.पण एवढा संघर्ष करून ही जर राजकारण आणि वर्गविषमतेचा कोणी बळी ठरतो तेव्हा मनस्वी दुःख झाल्याशिवाय राहात नाही.

मुलं कशाचा ध्यास घेतील सांगता येत नाही आणि आपला ध्यास पूर्ण करण्यासाठी किती मार्ग अवलंबतील हे ही सांगता येत नाही.पण अशा कोवळ्या मुलांच्या भावना खुडताना निबर समाज कसा बोथट झाला आहे हे पाहून दुःख झाल्याशिवाय राहात नाही.

रोजी-रोटीच्या दिनचर्येतून वेगळं करू पाहणाऱ्यांना कौतुकाची एक थाप खूप मोठ्या उंचीवर घेऊन जाऊ शकते.तसेच नाऊमेद केल्याने जीवन विस्कटून ही टाकू शकते हा संदेश म्होरक्या देतो.

अशोकला परेड करण्यापासून वंचित ठेवण्यासाठी केलेली योजना पाहून शहर सोडा, गावपातळीवर ही शाळेत केला जाणारा वर्गभेद ठळक होतो.अशोकची मुकी आई म्हणजेच दबलेला, पिचलेला समाज त्याविरुद्ध चकार शब्दही काढू शकत नाही किवा आपण असेही म्हणू शकतो की त्याला आपला छळ केलेला आहे हे समजण्याची कुवतही नसते,म्हणून ते मुकाट सहन करतात.

#अमर_देवकर यांनी सामान्य जनांच्या कथेतून भावपूर्ण,नेमका संदेश म्होरक्याच्या माध्यमातून दिलेला आहे.जनसामान्यांच्या चिमुकल्या प्रश्नांना हात घालताना तो बटबटीत न करता सहज,सरळ अभिव्यक्ती किती महत्त्वाची असते हे म्होरक्या पाहिल्यावर लक्षात येते.

मेंढक्या अशोक-रमण देवकर,वेडा सैनिक-अमर देवकर,मास्तर,मुकी आई, तोतरा देवकर,अशोकची वर्गमैत्रीण आणि बुलेटवल्याचा मुलगा.सगळ्यांच्या भूमिकेत अप्रतिम नैसर्गिक अभिनय ठासून भरकेला आहे.

छत्रपती शिवाजी,महात्मा गांधी, बॅरिस्टर आंबेडकर आदींच्या प्रतिमा निर्माण करणाऱ्या फ्रेम अप्रतिम झाल्या आहेत.

अनेक अडथळे पार करत थेटरमध्ये पोहचलेला
एक वेळ आवर्जून पहावा असा हा सिनेमा आहे #म्होरक्या...👌
Amar Chitravani