Monday, March 6, 2023

किल्ले भ्रमंती- जी लो जी भर के

भाजे गावापासून चार किलोमीटर अंतरावर विसापूर व लोहगड हे दोन किल्ले आहेत. अगदी समोरा-समोर. किल्ल्याच्या पायथ्यापर्यन्त कार व छोटी वाहने जातात. भाजे गावा शेजारच्या डोंगरात प्रसिद्ध भाजे लेणी आहेत. खूप सुंदर व विशाल ! आम्ही ट्रॅव्हल बसने आलो होतो. आम्ही गावात पोहचलो तेव्हा पहाटेच्या साडेपाच-सहा वाजले असतील. आमची बस एका छोट्याश्या हॉटेल समोर थांबली होती. बस ड्रायव्हरने माहिती काढली कि, मोठ्या गाड्या गडाच्या पायथ्यापर्यंत जात नाहीत. त्याने गावातच गाडी पार्क केली. ट्रेक सहल आयोजक प्रा.मस्के सरांनी सर्व ट्रेकर्सना तयार होण्याची सूचना केली. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर सहा रूम होत्या. त्यातील दोन रूम घेतल्या. मुलींसाठी एक रूम व इतरांसाठी एक. 

हॉटेलच्या समोर मस्के सर विद्यार्थ्यांना सूचना देतांना

मुलं झटपट तयार झाली. त्यांच्यात उत्साह खूप होता. आम्ही सुद्धा मस्त गरम पाण्याने आंघोळ केली व तयार होऊन खाली गेलो. सर्व ट्रेकर्सचे नाष्टा करणे चालू होते. पोहे-वगैरे. आम्ही नाष्टा केला. सात वाजले असतील. डोंगराआड सूर्य असल्याने अजून त्याचे दर्शन झाले नव्हते.
उत्साही विद्यार्थी ट्रेकर व आम्ही 
 
त्यंत उत्साहाने चालत निघालो. साधारणतः अर्ध्या तासात विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो. कच्चा रस्ता असल्याने काही ग्रुप मागे राहिले होते. त्यांची वाट पहायचे ठरले. किल्ल्याच्या पायथ्याला काही दुकाने व हॉटेल आहेत. छान झाडी आहे. रस्ता जरी कच्चा असला तरी धाडसी कार चालक आपल्या कार घेऊन येथे येऊ शकतात. मोटरसायकल सहज येते. पावसाळ्यात मात्र येथे येणे थोड त्रासाच आहे. कारण इथे पाऊस खूप असतो. 
किल्याच्या पायथ्याला क्षणभर विश्रांती 
सर्व समूह (group) एकत्र आल्यावर पुन्हा ट्रेक सुरू झाला. एका ओढयातून किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. पावसाळ्यात या मार्गातून जाणे तसे अवघड आहे. तरुण ट्रेकर्स असतील तर त्यांना त्रास होणार नाही. आमच्या बरोबर सगळे ट्रेकर्स तरुण असल्याने आम्हालाही भरपूर जोश आला होता. त्या कठीण मार्गावरून आम्ही सहज निघालो होतो. प्राध्यापक असल्याने आपण कायम तरुण पिढी सोबत राहतो त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. आपल्यालाही म्हातारे झाल्याचा फील येत नाही. सांस्कृतिक विभागात काम करतांना तर हे विशेष जाणवते. कलाकार मंडळी तर कधीच म्हातारी होत नसतात, हे सांगण्याची आवश्यकताच नाही?  तरूणांसोबत तो अवघड रस्ता ही सप्पय (सोपा) वाटू लागतो.
किल्ल्याची खडतर वाट चढतांना सोलापुरे सर 

ही वाट चढून गेल्यावर विसापूर किल्ल्याचे मुख्य द्वार लागते. ते जवळ-जवळ नष्ट झालेले आहे. किल्ल्यावर सुरुवातीला पाण्याचे हौद दिसतात. ते पाहून थोडे आत गेल्यावर एक महादेवाचे मंदिर आहे व भग्नावस्थेतील वाडा. या किल्ल्यावर कैदी ठेवले जायचे असे समजले. किल्ल्याचा परीसर मोठा आहे. किल्ल्याची तटबंदी काही ठिकाणी मजबूत आहे काही ठिकाणी ढासळली आहे. पाण्याचे हौद व हौदात कोरलेली मारुतीची मूर्ती आहे. आम्ही किल्ल्यावर पोहोचलो तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. अजून भरपूर वेळ होता. पूर्ण  किल्ला पाहून लोहगडला जायचे ठरले. किल्ला फिरतांना मस्त वाटत होते. किल्यावरील काही फोटोग्राफ -
किल्ल्यावरील महादेव मंदिर 

पाण्याची टाकी व मारुती 

किल्ल्याची तटबंदी 
किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या एका हॉटेल मध्ये जेवणाची अत्यंत उत्तम सोय केली होती. जेवण खूप चविष्ट व स्वादिष्ट होते. तांदळाची भाकरी, ठेसा, बटाटा भाजी, तेल न के बराबर, दाळ-भात, लोणचे, पापड, वांग्याची रुचकर भाजी, ताक. भारी बेत होता. चालून थकल्याने ते अजून चवदार लागत होते. भरपूर जेवण झाल्याने आळस आला होता पण पुढे लोहगड चढायचा असल्याने विश्रांती न घेता आम्ही लोहगडकडे निघालो. पुढील ब्लॉग मध्ये लोहगड संबंधी सविस्तर लिहू. तूर्त थांबू. आवडल्यास (प्रतिक्रिया) कॉमेंट द्या. धन्यवाद. 
-------------------------------------------------------------------

2 Comments:

At March 6, 2023 at 5:59 PM , Blogger Yuvraj Solapure said...

This comment has been removed by the author.

 
At March 6, 2023 at 6:15 PM , Blogger Yuvraj Solapure said...

Very Nice Sir

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home